Latest News

ग्रामीण तरुणांना स्वरोजगाराची प्रेरणा देणारी ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था

मंगळवार, २० मे, २०१४

भारत देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अशा परिस्थितीत केवळ शहरी भागाचा विकास होऊन चालणार नाही तर ग्रामीण भागाचाही विकास होणे गरजेचे आहे. सध्या च्या काळात ग्रामीण भागातील तरुणांचा ओढा शहरी भागाकडे अधिक दिसून येतो. शहरी भागातील रोजगाराच्या संधी या तुलनेत कमी असल्याने ग्रामीण भागातील तरुणांना बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जावे लागते. ग्रामीण भागातील तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत तर होईलच, पण देशाच्या विकासातही त्यांचे योगदान राहील. याच हेतूने ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

'खेड्याकडे चला' हा महात्मा गांधीजींचा संदेश खऱ्या अर्थाने अंमलात आणण्यात येत आहे. ग्रामविकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, हे लक्षात घेऊन ग्रामीण भागात उद्योग व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. स्टेट बँक ऑफ हैद्राबादने नाबार्ड व सिडबीच्या सहकार्याने ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (एसबीएच आरसेटी) स्थापन केली आहे.

ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न) गटातील बेरोजगार तरुणांना निवडून प्रशिक्षण देणे व स्वयंरोजगार उभारणीसाठी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागाच्या विकासासाठी तरुणांना प्रशिक्षण देणे, ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे, ग्रामीण भागातील विकासाला चालना देणाऱ्या संस्था प्रतिनिधींना प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे तसेच ग्रामीण भागात स्वयंसहायता बचत गट वाढीसाठी मार्गदर्शन करणे हे या संस्थेचे मुख्य उद्देश आहेत.

या संस्थेमध्ये सुमारे 18 प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध आहेत. हस्तकला, फोटोग्राफी, दुग्धव्यवसाय व्यवस्थापन, प्लंबिंग, कुक्कुटपालन, शेळीपालन, स्क्रीनप्रिंटीग/ बुकबाईंडिंग, टेलरिंग, मोबाईल रिपेअरिंग, ग्रामीण उद्योजकता विकास कार्यक्रम, बेसिक कॉम्प्युटर/ डीटीपी, उद्योजकता विकास प्रशिक्षण आणि महिलांसाठी टेलरिंग व ड्रेस डिझायनिंग, सॉफ्ट टॉईज (खेळणी), अन्न‍ प्रक्रिया, विविध गृहोपयोगी वस्तू बनवणे, ब्युटीपार्लर, स्वेटर बनविणे आदींचा समावेश आहे.

ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता आवश्यक आहे. उमेदवार परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा, कुटुंब प्रमुखाचे नाव दारिद्र्यरेषेच्या यादीत समाविष्ट असावे, वय 18 वर्षे ते 45 वर्षांपर्यंत असावे. शैक्षणिक पात्रता पुरुषांसाठी किमान सातवी तर महिलांसाठी किमान पाचवी उत्तीर्ण आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक आहे.

उमेदवाराने आपला प्रशिक्षण कार्यक्रम निवडतांना स्वत:ची आवड, शारीरिक क्षमता, आर्थिक कुवत, आजुबाजूला उपलब्ध साधनसामग्री, उत्पादनासाठी बाजारपेठ व मागणी सातत्य याचा साकल्याने विचार करणे अपेक्षित आहे.

पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहीत नमुन्यात संस्थेकडे पाठवावेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर मुलाखतीची तारीख कळविण्यात येते. उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने यावे लागेल. निवड समितीच्या निर्णयाप्रमाणे मुलाखतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारास प्रशिक्षणाची तारीख कळविण्यात येईल. व्यवसाय निवडीनुसार पात्र उमेदवारांना निवडलेल्या व्यवसायासंदर्भात तुकडी क्षमतेनुसार बोलविण्यात येईल. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.

निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींसाठी संपूर्ण प्रशिक्षण विनामूल्य आहे. निवासाची व्यवस्था, नास्ता, चहा भोजन विनामूल्य आहे. उत्तम व अनुभवी प्रशिक्षक, योग्य प्रशिक्षण, अद्ययावत तांत्रिक ज्ञान, अद्ययावत मशिनरी व सॉफ्टवेअर, भरपूर प्रात्यक्षिके व सराव, उद्योजकीय गुणवत्ता प्रशिक्षण आणि बँक व्यवहारासंबंधीचे मार्गदर्शन केले जाते.

प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक असतात. छायाचित्र असलेले ओळखपत्र (मतदान कार्ड, ड्रायव्हीं‌ग लायसन्स, पॅनकार्ड, बँक पासबूक इत्यादी), शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, रहिवासी दाखला, दारिद्र्य रेषेखालील नोंद असल्याचा पुरावा (फॅमिली ओळखपत्रासह), पासपोर्ट आकाराचे स्वत:ची 4 छायाचित्रे. इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज संस्थेकडे कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत जमा करावेत. अर्ज संस्थेकडे विनामूल्य उपलब्ध आहेत. संस्थेचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे : 27, शिवराम नगर (दक्षिण), शिवशक्ती बिल्डींगसमोर, वसमतरोड, परभणी (दूरध्वनी 02452-225550).

परभणी जिल्ह्यात ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (रुरल सेल्फ एम्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट – आरसेटी) 11 फेब्रुवारी 2011 पासून कार्यरत आहे. सध्या या प्रशिक्षण संस्थेचे संचालक दिलीप शिरपूरकर आहेत. संस्थेने दुग्धव्यवसाय व्यवस्थापन 50 प्रशिक्षण कार्यक्रम, मोबाईल रिपेअरिंग 4, कॉम्प्युटर डीटीपी 4, कॉम्प्युटर बेसिक्स 2, ड्रेस डिझायनिंग 3, ब्युटीपार्लर 1 असे सुमारे 68 प्रशिक्षण कार्यक्रम राबविले. त्यामधून 1 हजार 646 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये महिला उमेदवारांची संख्या 5 लक्षणीय आहे. संस्थेने 547 पुरुष तर 1 हजार 131 महिला उमेदवारांना प्रशिक्षण दिले.

ज्या व्यक्तीजवळ ज्ञान आहे, जीवनाचा अनुभव आहे आणि स्वयंपूर्ण बनण्याची इच्छा आहे, अशा ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांनी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे. तरुणांमध्ये उद्योजकीय गुण विकसित करण्यासाठी ही संस्था निश्चितच मार्गदर्शक ठरत आहे.
-राजेंद्र सरग

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.