Latest News

‘एमटीडीसी’ची पर्यटकांसाठी निवास आणि न्याहारी योजना

मंगळवार, १३ मे, २०१४



राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रयत्नाने स्थानिक व राज्याबाहेरील तसेच परदेशी पर्यटकांची संख्या हळूहळू वाढत आहे. राज्यातील विविध धार्मिक स्थळे, ऐतिहासिक महत्त्वाच्या जागा, समुद्रकिनारे, डोंगरदऱ्या आणि जंगले या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटक संकुलांऐवजी पूर्णवेळ वा कायमस्वरूपी वापरात नसलेले बंगले, घरे वा जागांचा उपयोग पर्यटकांच्या निवासाकरिता करता येऊ शकतो. या कल्पनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत शासनाच्या आदेशाप्रमाणे स्वतःच्या मालकीच्या घरामध्ये पर्यटकांसाठी निवास व न्याहारी योजना राबवण्यात येत आहे. 

या योजनेअंतर्गत स्थानिक घरमालकांची घरे/बंगले पर्यटकांच्या सोयीसाठी उपलब्ध करुन दिल्यास दोन फायदे संभवतात. एक म्हणजे पर्यटकांसाठी किफायती पद्धतीवर स्वच्छ, निवासाची घरगुती सोय उपलब्ध होईल. तसेच स्थानिक घरमालक किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी स्वयंरोजगार निर्माण होईल. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे राज्याबाहेरील किंवा परदेशी पर्यटकांना मालकांसमवेत राहून स्थानिक संस्कृति, राहणीमान, चालीरीती आणि खाद्यपदार्थ यांची चांगल्या प्रकारे ओळख होईल. याचा दूरगामी परिणाम म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे ध्येय साध्य करता येईल.

पर्यटकांसाठी निवास आणि न्याहारी योजनेची ठळक मार्गदर्शक तत्वे आखण्यात आली आहेत. त्यानुसार पर्यटकांसाठी निवास आणि न्याहारी योजना योजनेअंतर्गत काही निवडक पर्यटन स्थळांमध्ये पर्यटकांसाठी तात्पुरती राहण्याची न्याहारी देण्याची व्यवस्था होईल. अशी निवासस्थाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मान्यता मिळवलेली असावीत.

पर्यटकांना वापरासाठी देण्यात येणारी जागा / बंगले / वाडे अशी निवासस्थाने अर्जदाराच्या अधिकृत मालकीची असावीत. अर्जदार जर अधिकृत मालक नसेल तर निवासस्थानाच्या अधिकृत मालकाचा, अर्जदारास योजनेमध्ये सहभागी होण्यास हरकत नसल्यासंबंधी, दाखला सादर करावा लागेल. अशा घरमालकांना / अर्जदारांना या योजनेखाली प्रोत्साहन देण्यात येईल.

मान्यताप्राप्त जागी अर्जदार घरमालक पर्यटकांसाठी कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त दहा खाटांची (Beds) सोय निर्माण करील.
जे निवासस्थान / वाडा / बंगला पर्यटकांच्या निवासासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे ती वास्तु, स्वच्छ आणि शांत परिसरात असावी आणि अशा निवासस्थांनी सहजरित्या जाणे शक्य व्हावे. उपलब्ध होणारा वाडा / घर / बंगला उत्तम आणि मजबूत बांधकामाचा असावा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असावा. या योजनेअंतर्गत घर / बंगला / वाड्यांमध्ये चांगल्या दर्जाचे फर्निचर, फिटींग्ज, खाटा, इलेक्ट्रीकल कनेक्शन्स पडदे, दिवे वगैरेंची सोय असावी. तसेच घर/बंगला/वाडा हवेशीर असावा. उपलब्ध निवासी जागेत प्रथमोपचार व अग्नीशमन (First Aid Facility & Fire Extinguisher) ची व्यवस्था असावी.
खोल्या भाड्याने देण्याचे व न्याहारीसाठी आकारण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे दर ठरविण्याची घरमालकांना मुभा असेल. अशा ठरविलेल्या दराची किंवा दर सुधारित केल्यासंबंधीची सूचना घरमालकाने महामंडळास आगाऊ द्यावी. प्रचलित दर निवास स्थानात पर्यटकांना दिसतील अशा पद्धतीने प्रदर्शित केलेले असावेत.
घरमालक त्याच्या निवासस्थानी राहणाऱ्या सर्व पर्यटकांची नावे, पत्ते, राहण्याची / जाण्याची वेळ इत्यादि माहितीसह नोंदवही ठेवतील. तसेच पर्यटकांची तक्रार वगैरे नोंदण्यासाठी नोंदणीबुक असावी.

पर्यटकांसाठी निवास आणि न्याहारी योजना राबविण्यासाठी अर्जदाराने खालील कागदपत्रे सादर करावीत
- विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण पत्ता व दूरध्वनी क्रमांकासह
- रु. 1000 चा धनाकर्ष (DD) मपविम (MTDC) च्या नावे
- 7/12 चा उतारा
- प्रॉपर्टी कार्ड 
- 7/12 च्या उताऱ्यातील इतर संबंधितांचे संमतीपत्र
- ग्रामपंचायत/नगरपरिषद/नगरपालिका/महानगरपालिका यांचे निवास व न्याहारी योजना राबवणेबाबत ना हरकत प्रमाणपत्र
- जागेचा आराखडा
- चरित्र पडताळणी दाखला
- घराचा टॅक्स भरल्याची पावती
- रेशनिंग कार्डाची छायांकित प्रत
- लाईट, पाणी, दूरध्वनी बिलांची छायांकित प्रत
मुंबई आणि परिसरात जवळपास 800 जणांना ही योजना राबवण्यासाठी परवानगी मिळाली आहे. पर्यटनस्थळांचा विकास होण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या या योजनेच्या माध्यमातून पर्यटन विकास आणि स्वयंरोजगार प्राप्ती अशा दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतील. 

संप्रदा बीडकर

2 comments:

  1. निसर्ग वादळात नुकसान झाले त्यांना MTDC तर्फे नुकसान भरपाई आहे?

    ReplyDelete
  2. MTDC Hotels and lodge create how application form summits and grand permission


    ReplyDelete

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.