Latest News

चर्मकार समाजाच्या विकासासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ

गुरुवार, ०३ जुलै, २०१४



महाराष्ट्र चर्मोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1 मे 1974 रोजी कंपनी कायद्या अंतर्गत करण्यात आलेली असून, दि. 2.1.2003 च्या शासन निर्णयानुसार या महामंडळाचे नांव संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मर्यादित' असे करण्यात आले आहे. हे महामंडळ अनुसूचित जातीतील चर्मकार समाज व त्यांच्या पोटजाती उदा. चांभार, ढोर, होलार, मोची इत्यादी यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास करुन त्यांना दारिद्र्य रेषेच्यावर आणण्यासाठी स्थापन झाले आहे.

राज्यात चर्मोद्योग विकास करणे, अनुसूचित जातीमधील चर्मोद्योगातील कारागिरांचा विकास करणे, चर्मोद्योगातील तंत्रज्ञान विकसित करणे, चर्मवस्तूंसाठी बाजारपेठेची निर्मिती, राज्यातील चर्मोद्योग विकासासाठी चालना देणे या उद्दिष्टपूर्तीसाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली.

दर्यापूर जि. अमरावती (पादत्राण उत्पादन केंद्र), हिंगोली (पादत्राणे उत्पादन केंद्र), कोल्हापूर (पादत्राण उत्पादन केंद्र), सातारा (पादत्राण उत्पादन केंद्र) अशी महामंडळाची राज्यात चार उत्पादन केंद्रे आहेत.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजना

50 टक्के अनुदान योजना : 
  • या योजनेमध्ये राष्ट्रीयकृत बँकेमार्फत रु. 50,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या व्यवसायासाठी सवलतीच्या दराने अर्थसहाय्य दिले जाते. 
  • या अर्थ सहाय्यापैकी रु. 10,000/- कमाल मर्यादेपर्यंत 50 टक्के कर्जाची रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते. उर्वरित 50 टक्के कर्जाची परतफेड 36 ते 60 समान मासिक हप्त्यांत अथवा बँकेने ठरवून दिलेल्या हप्त्यांत बँकेकडे करावी लागते. 
  • बँकेकडून या योजनेखाली मिळणाऱ्या कर्जावर द. सा. द.शे. 9.5 ते 12.5 टक्के दराने व्याज आकारले जाते.
बीज भांडवल योजना : 
  • या योजनेमध्ये 50,001 रुपये ते 5,00,000 रुपये पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही योजनेसाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा सवलतीच्या दराने उपलब्ध करण्यात येतो.
  • या योजनेअंतर्गत 50,001 रुपये ते 5,00,000 रुपयांपर्यंतचा कर्जपुरवठा द. सा. द. शे. 9.5 ते 12.5 टक्के व्याज दराने बँकेमाफत करण्यात येतो.
  • या योजनेअंतर्गत बँकेने मंजूर केलेल्या कर्ज रकमापैकी 75 टक्के कर्ज रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येते.
  • 5 टक्के रक्कम ही लाभार्थ्यांने स्वत:चा सहभाग म्हणून बँकेकडे जमा करावयाची असते. उर्वरित 20 टक्के रक्कम ही महामंडळ बीज कर्ज म्हणून देते. त्या रक्कमेपैकी रु. 10,000/- अनुदान म्हणून देण्यात येताता तर उर्वरित रक्कम ही 4 टक्के व्याजदराने बीज कर्ज म्हणून देण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची परतफेड ही राष्ट्रीयकृत बँकेस व महामंडळास 36 ते 60 समान मासिक हप्त्यांत एकाचवेळी करावयाची असते.

50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजना सर्वसाधारण अटी व नियम :
  • अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त व 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागासाठी प्रत्येकी 1 लाखापेक्षा जास्त असू नये. 
  • अर्जदारास तो करु इच्छिणाऱ्या व्यवसायाचे ज्ञान असावयास हवे. 
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा व कायम रहिवासी असावा. 
  • अर्जदाराने अन्य शासकीय संस्थांकडून अनुदान घेतलेले नसावे व तो कोणत्याही संस्थेचा थकबाकीदार नसावा. 
  • अर्जदाराने सादर केलेला जातीचा व उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकाऱ्याने दिलेला असावा.
  • अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :
  • अर्जदाराचा शैक्षणिक, उत्पन्नाचा, जातीचा दाखला, नुकताच काढलेला पासपोर्ट साईजचा फोटो.
  • रेशनकार्डची झेरॉक्स प्रत, व्यवसायासाठी लागणाऱ्या स्थावर मालमत्तेच्या किंमतीचे दरपत्रक, अर्जदारास ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेच्या उपलब्धतेचा पुरावा किंवा भाड्याचे करारपत्र.
  • अर्जदारास व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका अथवा महानगरपालिकेचा 'ना हरकत" परवाना अथवा दुकाने अधिनियमाखालील परवाना (बीज भांडवल कर्ज मागणीसाठी).
  • प्रकल्प अहवाल (बीज भांडवल कर्ज मागणीसाठी), दोन सक्षम जामिनदार, एक नोकरदार व एक शेतकरी असावा, तसेच जामिनदारांचे प्रतिज्ञापत्र व पगारपत्रक (बीज भांडवल कर्ज मागणीसाठी)

प्रशिक्षण योजना :

  • चर्मकार समाजाच्या लाभार्थ्यांना व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी व संबंधित तांत्रिक व्यवसाय सुरु करण्यासाठी विविध व्यावसायिक ट्रेडचे शासन मान्यताप्राप्त संस्थेमार्फत (3 ते 6 महिन्यांपर्यंत) मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
  • त्यामध्ये शिवणकला, ब्युटीपार्लर, इलेक्ट्रीक वायरमन, टर्नर-फिटर, मशीनवर स्वेटर विणणे, खेळणी बनविणे, टि. व्हि-रेडिओ-टेपरेकॉर्डर मेकॅनिक, संगणक प्रशिक्षण, मोटार वाईन्डींग, फॅब्रिकेटर- वेल्डिंग, ऑटोमोबाईल रिपेअरींग (टु व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हिलर), वाहनचालक (मोटार ड्रायव्हिंग), चर्मोद्योग पादत्राण उत्पादन, चर्मोद्योग चर्मवस्तू उत्पादन.
प्रशिक्षणार्थी निवडीच्या अटी : 
  • अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा. 
  • अर्जदाराचे शिक्षण हे देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाकरिता पुरेसे असावे.
  • अर्जदार 18 ते 40 या वयोगटातील असावा.
  • प्रशिक्षण योजनेच्या संदर्भात बेरोजगारांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण योजनेमध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत असावे.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे.

अर्जासोबत सादर करावे लागणारी कागदपत्रे:
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अर्जदार यांचा फोटो, रेशन कार्ड किंवा निवडणमक आयोगाने दिलेले ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला.

विद्यावेतन :
मोफत प्रशिक्षणाव्यतिरिक्त प्रशिक्षणार्थीस दरमहा रु. 150/- ते300/-पर्यंत विद्यावेतन देण्यात येते.


संप्रदा द. बीडकर
जिल्हा माहिती कार्यालय
कोल्हापूर

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.