Latest News

स्त्री शक्तीच्या सन्मानासाठी

शनिवार, १९ जुलै, २०१४



‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ या शब्दामध्ये स्त्रीची व तिच्या ममतेची महती आपल्या पूर्वजांनी व्यक्त केली आहे. आजवर आपल्या समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. अशा स्त्रियांच्या कार्यांची माहिती समाजाला व्हावी या उद्देशाने मैलाचा दगड ठरणाऱ्या महिलांना महिला व बाल विकास विभागांच्या वतीने विविध पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची पावती दिली जाते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
  • महिला व बाल कल्याणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या समाजसेविका, स्वयंसेवी संस्था यांच्या कार्याची दाद द्यावी व त्यापासून प्रेरणा घेऊन महिला व बाल कल्याणाच्या उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे येतील, या हेतूने राज्य शासनातर्फे दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार महिला स्वयंसेवी संस्था व समाजसेवी संस्थांना दिला जातो. 
  • या अंतर्गत राज्यस्तरावर दरवर्षी एका महिलेस 1 लाख रुपये, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविले जाते. 
  • तसेच विभाग स्तरावर सन्मानप्राप्त महिलेस 25 हजार रुपये, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ दिल्या जातो.
  • तसेच जिल्हा स्तरावर समाजसेविका महिलेस 10 हजार रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविल्या जाते.

केंद्राचे राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार
  • बाल कल्याणाच्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 
  • व्यक्तिगत 50 हजार रोख व मानचिन्ह असे पुरस्कार व 5 संस्थांसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये व स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. 

राष्ट्रीय शूर वीर पुरस्कार
  • अपघातग्रस्त, संकटात सापडलेल्या व्यक्तिंचा स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धाडसाने, शौर्याने जीव वाचविणाऱ्या मुलांचा गौरव करण्याच्या दृष्टिने केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय शूर वीर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 
  • पहिला क्रमांक सुवर्ण पदक , स्मृती चिन्ह व रोख रक्कम, दुसरा क्रमांक चांदीचे पदक, प्रमाणपत्र व रोख रक्कम व तिसऱ्या क्रमांकास मुला-मुलींचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 
शिक्षण कला, कार्य किंवा खेळातील नैपुण्यासाठी पुरस्कार
  • शिक्षण कला, कार्य किंवा खेळामध्ये विशेष नैपुण्य दाखविणाऱ्या वर्ष 4 ते 14 वयोगटातील मुलांना केंद्र शासनामार्फत पुरस्कार देण्यात येतो. 
  • प्रथम पुरस्कारासाठी 20 हजार रुपये रोख व स्मृती चिन्ह, प्रमाणणत्र आणि सुवर्णपदक देऊन गौरविल्या जाते. 
  • इतर 35 पुरस्कारांसाठी चांदीचे पदक, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र आणि 10 हजार रोख केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात येते. 

राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार

शारीरिक व मानसिकदृष्टया अपंगत्व असलेल्या मुलांच्या कल्याणासाठी कोणतेही वेतन अथवा मानधन न घेता मानवी सेवा या उदात्त हेतूने सलग 10 वर्षे वैशिष्ट्यपूर्ण व अद्वितीय काम करणाऱ्या व्यक्तीस राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी केंद्र शासनातर्फे 1 लाख रुपये रोख व प्रशस्तीपत्र या स्वरुपात दिल्या जातो.

डॉ. दुर्गाबाई देशमुख उत्तेजनार्थ पारितोषिक

महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एका संस्थेस प्रतीवर्षी समाज कल्याण बोर्ड नवी दिल्ली मार्फत डॉ. दुर्गाबाई देशमुख उत्तेजनार्थ पारितोषिक 5 लाख रुपये देशभरातून एका संस्थेस देण्यात येते.

स्त्रीशक्ती पुरस्कार
  • भारतीय समाजाची मानसिकता बदलण्यासाठी महिलांना विविध क्षेत्रात काम करण्यास उत्तेजन देण्यासाठी स्त्रीशक्ती पुरस्कार प्रदान केला जातो. 
  • भारतीय समाजात स्त्रीचे स्थान बळकट करणे व वाईट प्रवृत्तीच्या आणि सतीसारख्या रुढीचे उच्चाटन करणे या कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 
  • या पुरस्काराचे स्वरुप 3 लाख रुपये रोख तसेच शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह असे आहे. विशेष म्हणजे या पुरस्काराचे वितरण 8 मार्च रोजी महिला दिनी नवी दिल्ली येथे केले जाते. 

-अपर्णा यावलकर (डांगोरे)
माहिती सहायक, संचालक (माहिती) कार्यालय, नागपूर

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.