Latest News

ग्रँट रोडवरील गर्दीवरील उपाय - आकाशी पादचारी पूल (स्कायवॉक)

शुक्रवार, २५ जुलै, २०१४



मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत मुंबईतील ग्रँट रोड येथे राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत आकाशी पादचारी पूल (स्काय वॉक) बांधण्यात आला आहे. ग्रँट रोड येथील आकाशी पादचारी पूलाचे उद्घाटन नुकतेच (23 जुलै 2014) ग्रामविकास तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री जयदत्त क्षीरसागर, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, आमदार प्रकाश बिनसाळे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर लगेचच हा पादचारी पूल जनतेसाठी खुला करण्यात आला.

मुंबईच्या पायाभूत विकासात भर घालणाऱ्या या पुलाची वैशिष्ट्ये :

•  मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांचे जाळे करण्यावर लक्ष देण्यात आले आहे. यामुळे मुंबईचा पर्यायाने देशाच्या विकासाला गती आली आहे.

•  वांद्रे-वरळी सागरी सेतू नंतर केबल भार उचलणारा हा दुसरा प्रकल्प असून या पादचारी पुलामुळे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

•  मुंबई परिसरातील वाढलेल्या वाहनांच्या वर्दळीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यास नेहमीच सहज शक्य होत नाही.

•  तसेच पादचाऱ्यांची प्रदुषण व अपघातापासून सुरक्षा व सोईसाठी गर्दी असलेल्या वाहतुकीची स्थळे व रेल्वेस्थानक क्षेत्रात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत आकाशी पूल बांधण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता.

• ग्रँट रोड येथील पादचारी आकाशी पुलाचे (स्काय वॉक) काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रकल्प कार्यान्वयन संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपविला होता.

•  पश्चिम रेल्वे मार्गावरील ग्रँट रोड हे अत्यंत महत्वाचे स्थानक आहे. त्यामुळे या स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये जा होत असते. रेल्वे स्थानकामध्ये आलेल्या प्रवाशांची मुख्यत्वे करुन नाना चौक व लॅमिंग्टन रोड या भागात मोठ्या प्रमाणात ये जा होत असते. येथील परिस्थितीचा विचार करता या ठिकाणी पादचारी आकाशी पूल होणे ही काळाची महत्वाची गरज होती व त्यानुसार हा पादचारी आकाशी पूल (स्काय वॉक) बांधण्यात आलेला आहे.

•  पश्चिमेकडील पादचारी आकाशी पुलाचे मार्ग रेषा नाना चौकापर्यंत असलेल्या बसच्या मार्गावरील जमिनीत असलेल्या मोठ्या व्यासाच्या पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीमुळे बसच्या मार्गाच्या मध्यापासून 1 मीटर अंतरावर घेण्यात आली आहे. नाना चौकात येऊन मिळणाऱ्या सर्व मार्गावरील प्रवाशांना आकाशी पूल वापरता यावा या दृष्टिने चौकामध्ये अंडाकृती चक्रमार्ग तयार करण्यात आला आहे.

•  पूर्वेकडील आकाशी पूल हा रेल्वेमार्गाचा पादचारी मार्ग ते मौलाना शौकतअली मार्गावरील रेल्वेमार्गावरील पुलास जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना सरळ शौकतअली मार्गावर जाता येते.

•  आकाशी पुलाची लांबी पूर्वेकडे अंडाकृती चक्रमार्गासह 515 मीटर पश्चिमेकडे 70.00 मीटर आहे. तर पुलाची रुंदी पश्चिमेकडील पूल - 4 मीटर, पूर्वेकडील पूल 3 मीटर आहे. आकाशी पुलावर छपरापर्यंत उंची 3 मीटर असून पश्चिमेकडे स्थिर पायरी जिने तसेच सरकते जिने बसविण्यात आलेले आहेत.

•  विशेष विद्युत व्यवस्था - पादचारी आकाशी मार्गामध्ये एमवाय-1 पध्दतीचे विद्युत फिटिंग्ज बसविण्यात आलेले आहेत. तसेच अंडाकृती चक्रमार्गासाठी विशेष प्रकारची विद्युत दिव्यांची व्यवस्था स्पॉटलाईटसह केलेली आहे. बाह्य विद्युत व्यवस्था विविध रंगातील LED, LEDOS विद्युत दिवे लावून आकर्षक केलेली आहे.

•  पायलॉन्स (लोखंडी आधार) - पुलासाठी 10 मी. उंची पर्यत लोखंडाचे 30 मि.मि.जाड व 2.50 मी व्यासाचे 60 समी.मी. जाड बेसप्लेटवर उभे केले आहेत व 10 मीटर वर 38.80 मीटर पर्यत 2 मीटर व्यासाचे 30 मि.मि. जाड लोखंडाचे तयार केलेले आहेत.

•  प्लायलॉन व अंडाकृती उन्नत चक्रमार्गासाठी 100 मि.मि. व्यासाचे 16 नग गज (स्ट्रेस बार) वापरले आहेत. या आकाशी पुलासाठी एकूण 110 मेट्रिक टन लोखंडाचा वापर झाला आहे.
-वर्षा फडके
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.