Latest News

चारसुत्री भात लागवडीची हमी अधिक उत्पादनाची

बुधवार, ३० जुलै, २०१४



रायगड जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे सर्वत्र लागवडीची धूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही शेतकरी पारंपरिक पध्दतीने भात लागवड करीत आहेत, तर काही मंडळी आधुनिक पध्दतीचा वापर करत आहेत. कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत रायगड जिल्ह्यात चारसुत्री भात लागवडीची योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या योजनेची थोडक्यात ओळख. . . .

भौगौलिक क्षेत्र

रायगड जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 6,86,892 हेक्टर असून त्यापैकी 1,23,700 हेक्टर क्षेत्रावर भात पिकांची लागवड केली जाते.

जिल्ह्याची भाताची उत्पादकता मागील वर्षी 2757 किलो प्रति हेक्टर आली. उत्पादकतेमध्ये वाढ होण्यासाठी या वर्षी राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत भात उत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

त्यानुसार ज्या क्षेत्रामध्ये उत्पादकता कमी आहे, अशा क्षेत्रामध्ये भात पिक प्रात्यक्षिके चारसुत्री लागवडीच्या तंत्रज्ञानांचा वापर करुन घेण्यात येत आहेत.

चारसुत्री भात लागवड

चारसुत्री भातशेती पध्दतीत मुख्यत्वेकरुन पुढील व्यवस्थापन सुत्रांचा अंतर्भाव होतो.

1) भात पिकांच्या अवशेषांचा फेरवापर.
2) गिरीपुष्पचा हिरवळीचे खत म्हणून वापर.
3) रोपांची नियंत्रित लावणी.
4) लावणीनंतर त्याच दिवशी युरीया-डिएपी ब्रिकेटचा जमिनीत खोलवर वापर.

हे कृषी तंत्रज्ञान पुढील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणालीवर आधारलेले आहे.

अ) भात पिक लागवडीची ही एक सुधारित पध्दत आहे.
ब) जमिनीतील व खताच्या माध्यमातून पुरविलेल्या पोषक अन्नद्रव्याचा जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापर करणे.
क) त्यासाठी एकात्मिक तत्वानुसार पिक लागवड करणे व किड व रोग व्यवस्थापन करणे.
ड) पिकांचे उत्पादन वाढविणे व ते दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करणे.
इ) या बरोबरच लागवडीचे व्यवस्थापन करतांना नैसर्गिक संपत्ती, हवा, पाणी, जमीन व पर्यावरण यांचे प्रदुषणापासुन संरक्षण करणे.

सूत्र-1-भात पिकांच्या अवशेषांचा फेर वापर.

यामध्ये मुख्यत्वेकरुन दोन भाग आहेत.
अ) सुधारित जातीची भाताची रोपे वाढविण्यासाठी भाताच्या तुसाच्या राखेचा रोपवाफ्यात वापर करणे. भाततुसाच्या राखेतील सिलिकॉन या अन्नद्रव्याचा रोपास पुरवठा झाल्याने भाताच्या रोपांना पुढील फायदे मिळतात.
ब) रोपांच्या लावणीपूर्वी भाताचा पेंढा जमिनीत गाढणे.
1) भात पिकास पालाश या अन्नद्रव्याचा पुरवठा होतो.
2) 20 क्विंटल पेंढा गाढल्यामुळे जमिनीत 20 ते 25 किलोग्रॅम पालाश व 100 ते 120 किलोग्रॅम सिलिका मिसळला जातो. यातून उपलब्ध पालाश व सिलिकॉन पिकास मिळाल्यामुळे पिकाची किड व रोगापासून संरक्षण होण्यास मदत होते.
3) जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांची वाढ होते.

सूत्र 2 - गिरीपुष्पाचा हिरवळीचे खत म्हणून वापर 

शेतकऱ्यांनी वनशेतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करुन गिरीपुष्पाच्या पानांचा हेक्टरी 20-30 क्विंटल या प्रमाणात हिरवळीचे खत म्हणून वापर करावा.

गिरीपुष्प हिरवळीच्य खताच्या वापराचे फायदे.
1) आर्थिकदृष्ट्या परवडणारे.
2) भाताचे खाचर गुंतून रहात नाही, तसेच लागवडीसाठी हंगामाची गरज नाही.
3) सेंद्रिय नत्राचा 10 ते 12 किलोग्रॅम प्रति हेक्टरी पुरवठा होतो.

सूत्र 3 - रोपांची नियंत्रीत लावणी

तिसऱ्या सूत्रामध्ये सुधारित जातींच्या भाताची नियंत्रीत लावणी पध्दतीचा अंतर्भाव केलेला आहे.

रोपवाफ्यात तुसाची राख वापरुन वाढविलेली 3 ते 4 आठवडे वयाची सशक्त रोपे लावणीसाठी वापरावीत.

या पध्दतीमध्ये दोन चुडातील ओळीतील अंतर 15 सें.मी. असे एका आड एक दोन्ही दिशेने राखले जातील.

या पध्दतीमध्ये चुडांची संख्या प्रति चौ.मी. लावणी क्षेत्रात 25 इतकी राखली जाते.

सूत्र 4 - युरिया-डीएपी ब्रिकेट्सचा वापर

चौथ्या सूत्रामध्ये रोपांच्या नियंत्रीत लावणीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांचा चौकोनात एक ब्रिकेट या प्रमाणात डायअमोनियम फॉस्फेटयुक्त युरिया (युरिया-डीएपी) ब्रिकेट्स जमिनीत 7 ते 10 से.मी. खोलीवर खोचाव्यात.

युरिया-डीएपी ब्रिकेट्स हे नत्र व स्फुरदयुक्त खत आहे. हे खत वापरल्याने
1) खताच्या वापराची कार्यक्षमता 90 टक्क्यांपर्यंत वाढते.
2) खाचरातील पाण्याबरोबर वाहून जाणाऱ्या नत्र व स्फुरदचे वाया जाण्याचे प्रमाण 5 टक्के पर्यंत खाली येते.
3) पिकास योग्य प्रमाणात खताचा पुरवठा होतो व खर्चामध्ये बचत होते.

रायगड जिल्ह्यात 46 शेतीशाळा

रायगड जिल्ह्यात या योजने अंतर्गत 46 प्रकल्पांची निवड करण्यात आली असून 0.40 हेक्टर क्षेत्राची 8450 प्रात्यक्षिके घेण्यात आली.

त्यात प्रात्यक्षिकासाठी बियाणे, युरिया ब्रिकेट, किड रोग नियंत्रणाकरीता फिरोमॅनट्रॅप्स इत्यादीचा पुरवठा करुन भाताचे उत्पादन वाढविण्याकरीता प्रयत्न केले जात आहेत.

तसेच शेतकऱ्यांना भातपिकांवर येणारे किड रोग व उत्पादन कसे वाढेल या विषयी माहिती मिळावी म्हणून 46 प्रकल्पामध्ये 46 शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच यात प्रति प्रकल्प 10 मातीचे नमूने काढण्यात आले असून एकूण 460 मातीचे नमुने तपासणी जातील.

त्या प्रकल्पातील शेतकऱ्यांना त्यांच्या माती नमुन्यावरुन माती मध्ये कोणते घटक आहेत व पुरेसे आहेत का, कमी असल्यास काय उपाय योजना कराव्यात या विषयीचीही माहिती शेतीशाळेत देण्यात येत आहे.

भात पिकाकरीता खतांची बचत करणे, रासायनिक खतांचा वापर कमी करणे, जमिनीचा पोत सुधारणे, या उद्देशाने भात खाचराच्या बांधावर ग्लिरीसिडीयाची जिल्ह्यामध्ये 25 लाख कटिंग / रोपांची लागवड करण्यात येत आहे.

या चारसुत्रीचा अवलंब शेतकऱ्यांनी केला तर निश्चित अधिक उत्पन्नाची हमी देता येईल.
-राजु पाटोदकर
जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.