Latest News

तयारी आपत्ती निवारणाची...

सोमवार, ३० जून, २०१४

पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर नदी-नाल्यांना पूर येतात. किनाऱ्यावर राहणाऱ्या कुटुंबांना अशावेळी विशेष काळजी घ्यावी लागते. माणसाचा जीव अत्यंत मौल्यवान असल्याने त्यांची सुरक्षितता आणि त्यानंतर संपत्तीचे रक्षण अशा दोन्ही पैलूंकडे लक्ष द्यावे लागते. त्याचबरोबर घाटमार्गावर भूस्खलनापासून सुरक्षीत राहण्यासाठीदेखील विशेष काळजी घ्यावी लागते.

पूर परिस्थितीत काय कराल? 
• पूर परिस्थिती असताना उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करुन आपली मालमत्ता व जीव वाचविण्याचा प्रयत्न करावा.

•  जर तुम्हाला पूरासंदर्भात पूर्वसूचना मिळाली असेल किंवा तुम्हाला पूर येईल अशी आशंका येत असेल तर तुमच्या  घरातील उपयुक्त सामान व महत्वाची कागदपत्रे इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवा.

•  घरातील वाहने, जनावरे काही उपयुक्त साहित्य उंच ठिकाणी हलवा.

•  गावात/घरात काही किटकनाशके असतील तर ती पाण्यात मिसळणार नाहीत याची दक्षता घ्या, जेणेकरुन पाणी प्रदुषित होणार नाही.

•  जर तुम्ही घर सोडणार असाल तर पाणी, वीज व गॅस कनेक्शन बंद करुन जा.

•  घर सोडून जाताना घराची दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करुन जा.
•  पूर आलेल्या भागात विनाकारण भटकू नका. गर्दी करु नका.

•  प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.

•  प्रवासात ओढे, नाले, नद्या आदींच्या पाण्याचा जोरदार प्रवाह असतांना त्यातून वाहने नेण्याचा प्रयत्न करू नका. स्थानिक नागरिक अथवा प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका.

दरड कोसळणे-
•  कोकणात तसेच राज्यातील इतर घाटमार्गावर पावसाळ्यात जास्त पर्जन्यवृष्टी झाल्यास डोंगर उतारावरील मुरुम व मातीच्या सच्छीद्र भुपृष्ठाला तसेच पठारावर असलेल्या खडकांना तडे जातात आणि तडे गेलेला भाग हळूहळू खचू लागतो आणि दरड कोसळण्याचे प्रकार घडतात.

•  भूभाग खचल्याने भिंतीना भेगा पडतात. घरांची पडझड होते.

•  झाडे, विद्युत खांब कलतात किंवा झऱ्यांची दिशा बदलते. किंवा नवीन ठिकाणी झरे निर्माण होतात.

•  विहिरींच्या पातळीत अचानक वाढ किंवा घट होते.

•  याप्रकारचे बदल आढळल्यास तातडीने तात्पुरत्या निवारा स्थळी स्थलांतरीत व्हा. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे आपल्यासोबत ठेवा.

•  अफवांवर विश्वास ठेऊ नका. जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा.

•  डोंगर उताराचा समतोल राखण्यासाठी वाड्या व गावठाणाचा विस्तार वाढवू नका. डोंगर उतारावर धोकादायक भागात नवीन घरे बांधू नका.

•  उतारावर चर खणू नका अथवा जंगलतोड करू नका. डोंगर उताराचे सपाटीकरण करू नका.

• आपत्तीच्या वेळी पोलीस-100 किंवा अग्निशामक यंत्रणा 101 अथवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा.

- जिल्हा माहिती कार्यालय,
रत्नागिरी

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.