Latest News

गावात आता पाण्याचं अकांऊट; दुष्काळ होईल चालता निमूट

मंगळवार, २४ जून, २०१४



नेहमीप्रमाणे आता पावसाळा आपल्या सर्वांच्या दारात येऊन उभा आहे.... नेमिचि येतो पावसाळा... मग वेगळं ते काय? असा प्रश्न पडणं नक्कीच स्वाभाविक आहे. पण यावर्षीचा पावसाळा नक्कीच वेगळा आहे. कारण यावर्षी प्रत्येक गाव माथ्यापासून पायथ्यापर्यंत गावात पडणाऱ्या पावसाचा थेंब नि थेंब अडवणार आणि मातीत जिरवणार आहे.

वाढत्या जागतिक तापमानावर सर्वत्र चर्चा होत असताना ग्रामविकास विभागाने इको व्हिलेजच्या माध्यमातून गावविकासाचे पर्यावरण स्नेही पाऊल टाकले... आता सातत्याने जाणवणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विभागाने त्यापुढचे पाऊल टाकत “पाणी साठवा-गाव वाचवा” अभियानांतर्गत जलसमृद्ध गावांची पायाभरणी करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात १५ जून ते १५ ऑक्टोबर या काळात अभियानाची अंमलबजावणी होईल. अभियानात सहभागी झाल्यानंतर स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतींनी तालुकास्तरावर ३१ डिसेंबरपर्यंत पंचायत समित्यांकडे अर्ज सादर करावयाचे आहेत. तर उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायतींचे प्रस्ताव पंचायत समित्यांनी जिल्हा परिषदेकडे ३१ जानेवारीपर्यंत पाठवावयाचे आहेत. जिल्हास्तरीय पुरस्काराची ग्रामपंचायतींची निवड १५ फेब्रुवारी पर्यंत केली जाईल.

अभियानात सहभागी होऊन गावांनी जर “आपलं गाव आपलं पाणी” या पद्धतीने उत्कृष्ट काम करीत गावातील पाण्याचं “अकांऊट” अचूक मेंन्टेन केलं तर दुष्काळ निमुटपणे चालता होण्यास मदतच होणार आहे...

अभियानापूर्वी...
पावसाळा सुरु होण्यापूर्वी गावाच्या विविध भौगोलिक क्षेत्रात पाच पर्जन्यमापके बसवण्यात येतील. याद्वारे गावात पडणाऱ्या पावसाची सर्वसाधारण वार्षिक नोंद घेतली जाईल. गावातील सध्याचा पाणीसाठा, गावची सध्याची भूजल स्थिती, मागील पाचवर्षात लावलेले टँकर, त्यावर झालेला खर्च, दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती, त्याचे सामाजिक-आर्थिक आणि गाव विकासावर झालेले परिणाम यांचा अभ्यास केला जाईल, नोंदी घेतल्याजातील. त्यानंतर गावचे वार्षिक पाणी अंदाजपत्रक तयार केले जाईल. दरम्यानच्या काळात पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब अडवून तो जिरवण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. गावात शोषखड्डे, रेनरुफ वॉटर हार्वेस्टिंग सारख्या सुविधांची निर्मिती केली जाईल. जुन्या योजनांची-प्रकल्पांची दुरुस्ती करून, त्यातील गाळ काढून त्यांची धारण क्षमता वाढवतांना भूजल पुनर्भरणाच्या कामाला गती दिली जाईल. महिला बचत गटांची देखील याकामात मदत घेतली जाईल.

अभियानादरम्यान...
गावात पडणाऱ्या पावसाचं “अकांऊट” देखील ग्रामपंचायतींमार्फत ठेवले जाईल. यामध्ये गावात पडलेला पाऊस, जमिनीत मुरलेला पाऊस, वाहून गेलेले पाणी, सांडपाण्याच्या स्वरूपात तयार होणारे आणि वाया जाणारे पाणी या सगळ्या स्वरूपातील पाण्याचा “हिशेब” ठेवण्यात येईल. या अभियानाची यशस्विता देखील तपासली जाईल. अभियानापूर्वी गावातील भूजल पातळी, गावातील विविध प्रकल्पातील पाणी साठा नोंदवून ठेवलेला असेल. त्यात अभियानानंतर किती वाढ किंवा घट झाली याचा अभ्यास करण्यात येऊन कारणमिमांसा केली जाईल.

अभियानात सहभागी होऊन ज्या ग्रामपंचायती टँकरमुक्त होतील किंवा ज्या ग्रामपंचायतीत जलसमृद्धता येईल त्या ग्रामपंचायतींना तालुका आणि जिल्हास्तरावर गौरविले जाईल.


डॉ. सुरेखा म. मुळे

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.