Latest News

कुटूंब दाखले पुस्तिका - एक लोकाभिमुख योजना

शुक्रवार, ०८ ऑगस्ट, २०१४



ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने राबविलेल्या परिवार कवच (कुटूंब दाखले पुस्तिका) या योजनेमुळे नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांनाही फायदा होत आहे. या अभिनव संकल्पनेची थोडक्यात ओळख...

राज्याच्या प्रशासनात महसूल विभागाचे महत्त्व वेगळे अधोरेखित करण्याची गरज नाही. महसूल म्हणजे प्रशासनाचा आरसा. महसूल विभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. या विभागाशी सर्वसामान्य जनतेचा संबंध येतो आणि म्हणूनच कमी त्रास आणि कमी वेळेत जनतेला अचूक माहिती देण्याचे काम महसूल यंत्रणेने केले आहे. आज संगणकाने संपूर्ण प्रशासनात नवी क्रांती आणली आहे.

कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी त्यांच्या कामातील दुबारपणा कमी करण्यासाठी व नागरिकांच्या हितासाठी जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या संकल्पनेतून तहसिलदार कार्यालय, ठाणे यांच्यामार्फत राबविण्यात येणारी परिवार कवच (कुटूंब दाखले पुस्तिका) ही एक अभिनव संकल्पना.

गरज - 
  • ठाणे तालुका हा ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका व मिरा-भाईंदर महानगरपालिका या तीन महानगरपालिकांनी व्यापलेला असून तालुक्याची लोकसंख्या सुमारे 38 लाख एवढी आहे. 
  • महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध प्रकारचे दाखले दिले जातात. विशेषत: शैक्षणिक वर्ष सुरु होताना विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले उपलब्ध करून देताना महसूल विभागावर मोठ्या प्रमाणात ताण पडतो. 
  • वर्षभरात साधारणत: 1 लाखापेक्षा जास्त दाखले वितरित करावे लागतात. 
  • आवश्यक असणारे शालेय दाखले प्राप्त करून घेणेसाठी विद्यार्थी व पालकांची तहसिलदार कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. 
  • विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक प्रवेशासाठी दाखले वेळेत शाळा/कॉलेज मध्ये जमा करावयाचे असतात, त्यामुळे त्यांचे शैक्षणिकदृष्टया नुकसान होऊ नये हा दृष्टीकोन लक्षात घेऊन त्यांना वेळेतच दाखले उपलब्ध होतील याची दक्षता घेणे जरुरीचे आहे.

स्वरुप - 
  • प्रचलित पध्दतीत स्थानिक वास्तव्य,उत्पन्न, अधिवास, जात व नॉन क्रिमिलेअर हे दाखले व्यक्तीनिहाय दिले जातात.

  • त्याऐवजी परिवार कवच संकल्पनेतून एकत्र कुटूंबनिहाय दाखले देण्याची कार्यपध्दती सुरु करण्यात येत आहे. 
  • त्यासाठी कुटुंबातील सदस्यांची माहिती एकाच अर्जामध्ये उपलब्ध करून घेऊन त्याआधारे कुटूंब पुस्तिकेच्या स्वरुपात वास्तव्य, उत्पन्न, अधिवास, जात व नॉन क्रिमिलेअर हे दाखले एकत्रित देण्यात येणार आहेत. 
  • परिवार कवच ही कुटुंबातील सर्व सदस्यांना एका अर्जाच्या आधारे वय अधिवास, जातीचा दाखला व नॉन क्रिमिलेअर, उत्पन्न दाखला, स्थानिक दाखला एकत्रित देण्याची संकल्पना आहे. 
  • कुटूंबामध्ये पती-पत्नी व मुलांचा समावेश करण्यात आला आहे. 
  • शासन परिपत्रक दि.14 ऑगस्ट 2013 नुसार उत्पन्न व नॉन क्रिमिलेअर दाखला 3 वर्ष मुदतीसाठी दिला जाणार आहे. 
  • शासन परिपत्रक दि.14 ऑगस्ट 2013 नुसार प्रतिज्ञापत्राऐवजी स्वंयघोषणापत्राच्या आधारे दाखले दिले जाणार आहेत. 
  • दाखल्याची गुणवत्ता व सुरक्षितता टिकविण्यासाठी Security paper चा वापर केला जाणार आहे.

व्याप्ती - 
  • परिवार या उपक्रमाद्वारे 10 वी व 12 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दाखले उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील सर्व शाळा व कॉलेजमध्ये शिबिराचे आयोजन करून सर्व प्रकारचे दाखले कुटूंब दाखले पुस्तिका स्वरुपात मार्च 2013 पर्यंत उपलब्ध करून देणे.
फायदे - 
  • या पध्दतीत स्थानिक वास्तव्य,उत्पन्न, अधिवास, जात व नॉन क्रिमिलेअर हे दाखले व्यक्तीनिहाय दिले जातात. त्याऐवजी एक अर्जाद्वारे कुटूंबातील सर्व सदस्यांना एकत्र कुटूंबनिहाय दाखले दिले जाणार आहेत. 
  • एका कुटूंबातील एकापेक्षा जास्त मुले असल्यास प्रत्येक मुलास किमान 4 दाखले याप्रमाणे 10 ते 12 वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज सादर करून तीच तीच कागदपत्रे सोबत जोडावी लागत असतात. तसेच प्रत्येक अर्जाची कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी यांना छाननी करून निर्णय घ्यावा लागतो. त्याऐवजी फक्त एका अर्जाद्वारे सर्व दाखले उपलब्ध होणार असल्याने अधिकारी/कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताण कमी होणार आहे. 
  • नागरिकांना वारंवार सेतू कार्यालयात यावे लागणार नाही. त्यामुळे त्यांचा वेळ व पैशाची बचत होणार आहे. 
  • अधिकारी व कर्मचारी यांना एकच अर्ज तपासावा लागणार असल्याने त्यांच्यावरील कामाचा ताण कमी होऊन कामातील दुबारपणा कमी होणार आहे. 
  • शैक्षणिक वर्ष सुरु होताना विद्यार्थी व पालकांची होणारी गैरसोय कमी होणार आहे. 
  • एकाच वेळी जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर दाखला, वय अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला, स्थानिक वास्तव्याचा दाखला, उत्पन्न दाखला हे सर्व दाखले उपलब्ध होणार आहेत. 
  • परिवार कवच ही संकल्पना अंमलात आल्याने दाखल्यांची संख्या 30 टक्के पर्यंत कमी होणे अपेक्षित आहे. 
  • सेतू व महा-ईसेवा केंद्रामार्फत दाखले वितरीत करताना शासनाने निश्चित केलेली फी दाखल्यांच्या संख्येच्या प्रमाणात आकारण्यात येईल. तसेच Security Paper करीता व अर्ज फी स्वतंत्र आकारण्यात येईल.

-विभागीय माहिती कार्यालय,
कोंकण विभाग, नवी मुंबई

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.