Latest News

बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य

सोमवार, ०४ ऑगस्ट, २०१४



महाराष्ट्र हे उपेक्षित घटकांसाठी योजना राबविण्यात नेहमीच आघाडीवर राहत आलेले राज्य आहे. नव्या योजना निर्माण करणे, त्यांची अंमलबजावणी करणं यातही महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिला आहे. त्यादृष्टीनं विचार केला तर असंघटित क्षेत्रातील कामगार हे तसे दुर्लक्षित राहत आले. पण महाराष्ट्र सरकारने या असंघटित क्षेत्रात अतिशय मोठा वर्ग असलेल्या बांधकाम कामगारांसाठी धोरणं ठरविली आहेत. एवढेच नव्हे तर या बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचीही निर्मिती केली. असंघटित आणि ज्यांना स्वत:चा असा आवाज नसणाऱ्यांना कायद्याचं संरक्षण देण्यात येणारं, त्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन काम करीत आहे. अशाच बांधकाम कामगारांसाठीच्या भेटवस्तू योजनेविषयी थोडक्यात माहिती...

बांधकाम कामगारांसाठी निर्णय
  • महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 21 ऑक्टोबर 2013 रोजी बांधकाम कामगारांना भेटवस्तू देण्याचा ठराव केला आहे. 
  • त्यानुसार उद्योग,उर्जा आणि कामगार विभागाने 24 जानेवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार बांधकाम कामगारांना मच्छरदाणी, ब्लॉकेट, चादर, जेवणाचा डब्बा, चटई या पाच वस्तू खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • यासाठी 30 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भेटवस्तू खरेदी करुन देण्याऐवजी कामगारांना त्यांच्या पसंतीच्या वस्तू खरेदी करता याव्यात या दृष्टिकोनातून बांधकाम कामगारांस तीन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. 

कार्यपद्धती
  • बांधकाम कामगारांना या अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टिकोनातून आणि लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखांमार्फत यात प्रामुख्याने अपर कामगार आयुक्त, कामगार उप आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांच्यामार्फत अर्थसहाय्याचे वाटप करण्यात येत आहे. 
  • प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर मंडळाच्या नावे एक स्वतंत्र बचत बँक खाते उघडण्यात आले आहे. 
  • राज्य शासनाने जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुखांना हे अर्थसहाय्य आरटीजीएस किंवा धनादेशाव्दारे लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी तसेच जिल्हास्तरावरील बचत बँक खात्याचे परिचलन (ऑपरेट) करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. 
  • लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरीत करण्यापूर्वी संबंधित लाभार्थी प्रत्यक्ष नोंदणीकृत असल्याची खात्री करण्यात येणार आहे. 
  • अर्थसहाय्य तातडीने वितरीत करता यावे म्हणून कामगार आयुक्त तथा अध्यक्ष महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ हे कार्यपध्दतीबाबत आवश्यक ते आदेश देऊ शकतात. 
  • बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे विविध सोळा प्रकारच्या कल्याणकारी योजना अंतर्गत हे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. 

जालना जिल्ह्यातील नोंदणी
  • जालना जिल्ह्यात पाच हजार 317 बांधकाम कामगारांची 1 जून 2014 पर्यंत नोंद झाली आहे. 
  • सर्व 5317 बांधकाम कामगारांना तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य आरटीजीएस प्रणालीव्दारे संबंधित कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. 
  • सध्या मंडळीकडे 2800 अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्राप्त आर्जाची पडताळणी करुन परिपूर्ण असलेल्या अर्जातील 772 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी तीन हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. 
  • अर्जात त्रुटी आढळलेल्या कामगारांशी संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करुन घेण्यात येत आहे. त्रुटी पूर्ततेनंतर लगेच त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार आहे. 
  • राज्य शासनाने जाहीर केलेल्या या कल्याणकारी योजनेचा लाभ अधिकाधिक कामगारांना व्हावा ही अपेक्षा असल्याने मंडळाकडे नोंदणी केलेल्या जालना जिल्ह्यातील बांधकम कामगारांनी सरकारी कामगार अधिकारी श्री. गायकवाड यांच्या संपर्क साधवा, असे आवाहन केले आहे.
- यशवंत भंडारे
जिल्हा माहिती अधिकारी, जालना

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.