Latest News

रुग्णांसाठीची 'जीवन अमृत सेवा' - कॉल ऑन ब्लड

शनिवार, ०२ ऑगस्ट, २०१४



अपघातानंतर वा नाजूक परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावयास लागू नये. अत्यंत तातडीच्यावेळी रुग्णाला तासाभरात योग्य रक्ताचा पुरवठा करणारी '104' अर्थात जीवन अमृत सेवा ही महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली योजना रुग्णांच्या जीवनाला 'अमृत' देणारी योजना ठरली आहे. या योजनेविषयी थोडक्यात माहिती...

पथदर्शी प्रकल्प
  • महाराष्ट्रात जीवन अमृत सेवा योजना राबविण्याविषयी सिंधुदुर्ग आणि सातारा हे दोन पथदर्शी जिल्हे निवडण्यात आले आहेत. 
  • 19 फेब्रुवारी 2013 रोजी सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. देशातील पहिलीच अशी ही योजना आहे. 
  • राज्य रक्त संक्रमण परिषदेच्यावतीने राज्यात राष्ट्रीय 'रक्त धोरण' राबविण्यात येत आहे. 
  • या धोरणाचा भाग म्हणून रुग्णांना सुरक्षित, सहज रक्त व रक्त घटक उपलब्ध करुन देण्यात येते. 

टोल फ्री क्रमांक
रुग्णालय, नर्सिंग होम अथवा रुग्णालयात भरती झाल्यानंतर रुग्णास डॉक्टारांच्या सल्ल्यानुसार रक्ताची आवश्यकता असल्यास नातेवाईकांना रक्तपेढीकडे धावाधाव करावी लागते. नातेवाईकांची होणारी ही धावपळ लक्षात घेऊन 104 हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला.

कॉल करा, रक्त मिळवा
  • रुग्णांच्या नातेवाईकांनी 104 या क्रमांकावर संपर्क साधला असता 40 किमी अंतरातील किंवा सर्वसाधारणपणे 1 तासाच्या अंतरावरील रुग्णालयात संदेशवाहक भेट देवून तेथील रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेवून माघारी येतो. 
  • त्यानंतर लगेचच तो आवश्यक त्या रक्त घटकाची तसेच रक्त गटाची पिशवी शीतसाखळी पेटीतून रुग्णापर्यंत तात्काळ पोहचवतो. 
  • या शीतसाखळी पेटीमधे एक तापमान नियंत्रक तसेच डाटा लॉगर असतो.
  • संदेशवाहकामार्फत संबंधित रुगणालयात अथवा नर्सिंग होममध्ये रक्ताचा पुरवठा किती वेळेत केला गेला आणि त्या रक्ताचे तपमान काय होते याची माहिती डाटा लॉगरच्या माध्यमातून लॅबमधील असणाऱ्या संगणकावर डॉक्टरांना मिळते. 

साताऱ्यातील अंमलबजावणी
  • क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालयात या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 42 रुग्णालयांनी आपली नोंदणी केली आहे. 
  • योजनेअंतर्गत शासनामार्फत रुग्णालयांना एक रक्त पिशवी 1050 रु. व नर्सिंग होमपर्यंत अंतरासाठी 100 रुपये असे सर्व मिळून 1100 ते 1150 रुपयांना पोहचविण्यात येते.
  • सध्या दोन संदेशवाहकांमार्फत रक्त पिशवी पोहचविण्यात येते. 
  • काही वेळेला रुग्णांचे नातेवाईक थेट संपर्क साधून रक्तपेढीतून रक्त पिशवी घेवून जातात. 
  • आतापर्यत या योजनेअंतर्गत 358 रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यात आलेला आहे. 
  • या योजनेअंतर्गत रक्तदात्यांना रक्तदानानंतर प्रमाणपत्र दिले जाते. त्याचा कोणत्याही शासकीय रक्तपेढीतून दोन वर्षाच्या मार्यादेत राज्यातील कोणत्याही शासकीय रक्तपेढीतून आवश्यक असणाऱ्या रक्ताचा पुरवठा विनामूल्य करण्यात येतो. 
  • गरजवंत रुग्णाला आवश्यक असणाऱ्या रक्ताच्या पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्तदानाची गरज असते. त्यासाठी आम्ही महाविद्यालयामंध्ये जावून प्रबोधन करीत असतो असे क्रांतिसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. पद्माकर कदम यांनी सांगितले.
  • जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने सुरु कलेली जीवन अमृत सेवा ही खरोखरच रुग्णांना एक प्रकारे अमृत देणारी योजना ठरलेली असून नातेवाईकांनी रक्तासाठी 104 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
  • सध्या संपूर्ण राज्यात ही योजना सुरु असून 104 या टोल फ्री क्रमांकावर नातेवाईकांनी संपर्क साधावा. महाराष्ट्र शासनाची ही योजना खऱ्या अर्थने नातेवाईकांना उभारी देणारी तर रुग्णांना जीवनदायी देणारी ठरलेली आहे.


प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी,
सातारा

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.