Latest News

गौरवाचे युवा पुरस्कार

गुरुवार, ०२ जानेवारी, २०१४

देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये युवक-युवतींचे फार मोठे योगदान असते. युवा पिढीला सक्षम करण्यासाठी कार्य करणाऱ्या युवांना पुरस्कार देण्याची राज्य शासनाची योजना आहे. या विषयीची ही माहिती 

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध विषयात युवांनी पार पाडलेल्या भुमिका, दिलेले योगदान यामुळे युवांची एक अद्वितीय समुह अशी ओळख समाजात झालेली आहे. युवांना मानव संसाधन विकासाचा मुख्य स्त्रोत म्हणून देखील मान्यता देण्यात आलेली आहे. युवा हा समाजाचा अविभाज्य घटक असून विकास प्रक्रियेतील आवश्यक भाग आहे. समाजातील युवांची संख्या पाहता त्यांचेसाठी स्वतंत्र विचार करण्याची आवश्यकता आहे. वैश्विकरणाच्या युगात नवीन आव्हानांना तोंड देण्याकरीता युवांच्या सक्षमीकरणाची गरज आहे. त्या अनुषंगाने राज्याचे युवा धोरण 2012 जाहीर करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या धोरणातील शिफारशीच्या अनुषंगाने राज्य व जिल्हा युवा पुरस्कार देण्याची योजना शासनाने जाहीर केली आहे. 

राज्यातील, जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. 

पुरस्काराचे स्वरुप
जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. सदरचा पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रु. 10 हजार (प्रति युवक व युवतींसाठी), प्रति संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रु. 50 हजार अशा स्वरुपाचा असेल. 

राज्य स्तरावर युवा पुरस्कार क्रीडा विभागाचे क्षेत्रिय विभागानुसार प्रत्येक विभागातील एक युवक, एक युवतीस एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. सदरच्या पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार व्यक्ती रु. 50 हजार व संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार रु. 1 लाख असे असेल. 

पात्रतेचे निकष 

युवक व युवतींसाठी पात्रता निकष- अर्जदार युवक, युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्षे पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्ष असावे. जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यातील सलग 5 वर्ष वास्तव्य तर राज्यस्तर पुरस्कारासाठी राज्यात 10 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्रे कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इत्यादी) अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक / कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

संस्थांसाठी पात्रता निकष
पुरस्कार संस्थेस विभागून दिला जाणार नाही. संस्थानी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ. अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 नुसार पंजीबध्द असावी. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थांचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अर्जदार, संस्थेच्या सदस्यांचा पोलिस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला संबंधित परिक्षेत्रातील पोलिस स्टेशनचे देणे आवश्यक राहील. 

पुरस्कारासाठी मुल्यांकन 
युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य दि. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील गत तीन वर्षाची केलेली कार्य कामगिरी विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य. राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य. समाजातील दुर्बल घटक, अनुसूचीत जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य. शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रुण, व्यवसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य. राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य. नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण, साहस इत्यादीबाबतचे कार्य. 

पुरस्कार निवड समिती
गठीत केलेल्या समित्यांनी शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या कार्यप्रणालीचा अवलंब करुन पुरस्कारार्थींची निवड करावयाची आहे. जिल्हास्तर पुरस्कार निवड समितीत जिल्हाधिकारी अध्यक्ष. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संबंधित विभागाचे सहअध्यक्ष. राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी, जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती दोन सदस्य. जिल्हा समन्वयक नेहरु युवा केंद्राचे सदस्य, जिल्हा क्रीडा अधिकारी सदस्य सचिव. तर राज्यस्तर पुरस्कार निवड समितीत मंत्री, क्रीडा व युवक कल्याण अध्यक्ष, राज्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण उपाध्यक्ष, अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव सदस्य, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी / राज्य युवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती दोन सदस्य, राज्य समन्वयक, नेहरु युवा केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य सदस्य. आयुक्त / संचालक क्रीडा व युवक सेवा सदस्य सचिव राहतील. 

जिल्हा / राज्यस्तर अशासकीय सदस्य नियुक्तीचा अधिकार संबंधित समिती अध्यक्षांना राहील अशा सदस्याचा कार्यकाल पुरस्कार वर्षापुरता मर्यादीत राहील. गठीत समितीने प्रतिवर्षी एक युवा व एक संस्था यांच्या नावाची शिफारस राज्य पुरस्कारासाठी करावी लागते. 

पुरस्काराचे वेळापत्रक 

जिल्हास्तर पुरस्काराचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. फेब्रुवारी महिन्यात अर्ज मागविण्यात यावेत व मार्च महिना अखेर त्याची छाननी करण्यात येऊन पुरस्कार निवड समितीची बैठक घेण्यात येऊन पुरस्काराबाबत जिल्हा युवा पुरस्कार निवड समितीकडे अर्ज सादर करण्यात यावेत. एप्रिल महिन्यात जिल्हा स्तरावर पुरस्कार जाहीर करण्यात यावे. 1 मे या महाराष्ट्र दिनी जिल्हा पुरस्काराचे वितरण करण्यात यावे. राज्यस्तर पुरस्काराचे वेळापत्रक - पुरस्कारासाठी एप्रिल अखेर अर्ज मागवावेत. राज्यस्तर पुरस्काराची छाननी 15 जून पर्यंत करावी. शासनाची अंतिम मान्यता 15 जुलै पर्यंत व्हावी. पुरस्कार वितरण 23 ऑगस्ट रोजी करण्यात यावे. वेळापत्रकामध्ये परिस्थितीनुरुप बदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात येत आहेत. जिल्हा व राज्यस्तर पुरस्कारासाठी लाभार्थींनी करावयाचा नमुना अर्ज प्रपत्र अ व ब मध्ये विहित केला आहे. अर्जदारांनी तो क्रीडा व युवा संचालनालयाचे संकेतस्थळ www.sport.maharahtra.gov.in वर ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. राज्यस्तर व जिल्हास्तर पुरस्कार अनुदान मंजुरीचे अधिकार आयुक्त, संचालक क्रीडा व युवक सेवा यांना आहेत. 

समाजामध्ये युवक-युवतींच्या विकासासाठी काम करणाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी युवा पुरस्काराची योजना राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने आखली असून युवांना प्रोत्साहित करुन नव्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी व देशाला मजबूत करणाऱ्या पिढीचे सक्षमीकरण करण्यासाठी ही योजना अत्यंत प्रभावी ठरत आहे. युवा क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींनी निश्चित या योजनेचा लाभ घ्यावा ही अपेक्षा !

- अनिल आलुरकर
जिल्हा माहिती अधिकारी,नांदेड

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.